मी पुन्हा जन्मले ! त्या सुळक्यावर! -"तैल-बैला"!



मी पुन्हा जन्मले ! त्या सुळक्यावर! - तैल बैला
मुलगी लहान असताना घरच्यांची ताई, लग्न झाल्यावर बाई आणि मुलं झाल्यावर आई! अश्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यांवरून जात असते. लहान असताना आपला ५ वा आणि त्यापुढील वाढदिवस यात खूप तफावत जाणवते, किंबहुना तो साजरा करायच्या पद्धतीत देखील.
आपण आपल्या आयुष्यात आणि घरच्यांच्या सेवेत इतके मग्न होतो कि आपल्या जन्माचे महत्व आणि कौतुक आपल्यालाही फारसं राहत नाही.
वाढदिवसाच्या दिवशी कोणी आपल्याला शुभेच्या दिल्या नाहीत किंवा कोणी जवळची व्यक्ती त्या द्यायला विसरलं, हव्या त्या पद्धतीने सेलेब्रेशन नाही झालं म्हणून मन नाराज होत हे खर. कारण अपेक्षा.. पण आपण स्वतःकडून कधी काय अपेक्षा करतो का? अशी अपेक्षा दुसऱ्या कडून ठेवण्यापेक्षा त्या दिवशी आपणच आपल्या पद्धतीने का बर स्वतःच कौतुक करू नये, तो एक दिवस स्वतःसाठी का राखून ठेऊ नये.. या सारख्या प्रश्नाची उत्तरे शोधात मी यंदाचा माझा वाढदिवस माझ्या बुद्धीला आणि क्षमतेला झेपेल अशा अनोख्या पद्धतीने साजरा करत साहसी पद्धतीने पुढील नवीन वर्षात पदार्पण केलं.


ट्रेकिंग आणि क्लाइंबिंग च्या विश्वात आई झाल्यावर पाऊल ठेवलं तेव्हा समजलं कि महाराष्ट्राला लाभलेल्या ३५० किल्ले आणि १०० पेक्षा अधिक सुळके हेच आपलं वैभव आहे.
कधी बघायचं ते?
कधी अनुभवायचं ते?
कधी बघायचा महाराष्ट्र त्या उंचपुर्या सुळक्यावरून?
कधी भिडायचं त्या काळ्या कातळांना?..
विचार केला तर आयुष्य अपुरं आहे. पूर्ण होवो न होवो पण कधीतरी आणि कुठूनतरी आरंभ व्हायलाच हवाच . २ वर्षांपूर्वी मी तो केला.
आगळा वेगळा महाराष्ट्र माझ्या सोबत माझ्या ३ वर्षाच्या मुलीला देखील दाखवत आत्तापर्यंत १८ किल्ले, अनेक रानवाटा पालथ्या घातल्या.



किल्ले भटकंती सोबत आता सुळके देखील साद घालत आहेत. काही मंहिन्याच्या प्रशिक्षणानंतर आयुष्यातील पहिला सुळका निवडला- लोणावळ्याजवळील "तैल-बैला"!
एखाद्या खोलगट परातीत ब्रेडचे दोन स्लाईज उभे करून ठेवावे, अशी अनोखी रचना. कुठूनही नजरेस पडतील अश्या त्या आयताकृती काताळी भिंतींची ठेवणं.
या वर्षी घरात नाही तर सुळक्यावरच केक कोपेल अशी शपथच घेतली होती. १६ नोव्हेंबर रोजी ३० -३२ जणांची टीम तैल -बैल या जेमतेम ३५० लोकसंख्या असलेल्या गावात पोहचली. त्या रात्री चंद्राची कोर तीच लोभस रूप उधळत होती. लोकडाऊनच्या मोठ्या विश्रांतीनंतर आम्ही ट्रेकर्स अनेक दिवसांनी भेटलो होतो. गुजराथ, अकोले, मुंबई, सांगली आणि पुणे या ठिकांणीवरून माझे मित्रपरिवार जमले होते. गप्पा-टप्पा , मस्ती, अनुभव आणि आमच्या अशक्य बडबडीमुळे गाव रात्री १२ पर्यंत जाग राहील.


१७ नोव्हेंबर चा दिवस पहाटे ४ ला चालू झाला. नास्ता आणि चहा घेऊन, पाठीवर क्लाइंबिंग रोप, कमरेला कॅराबिनर लटकावून, हेड टॉर्चच्या मिणमिणत्या प्रकाशात आम्ही तैल बैलाच्या सुळक्यापाशी पोहचलो. माझ्या मुलीची म्हणजे स्वानंदीची हि पहिली पहाट, ज्यात तिने पहिल्यांदाच सूर्य उगवताना आणि आभाळ प्रकाशमान होताना पाहिलं असेल. सुळक्याच्या पायथ्याशी टेन्ट उभारला, सामान टाकलं. सगळ्याच क्लाइंबिंग यशस्वी पार पडो यासाठी प्रार्थना केली, पर्वतराजाला हार, फुल आणि नारळाचा प्रसाद चढवला. छत्रपती शिवाजी महारांचा जयघोष- (गारद) करून, मनोमनी त्यांना नमन केल व आशीर्वाद घेतले.
गारद ऐकताना अंगावर सर्रकन काटा, डोळ्यात चमक आणि सळसळणाऱ्या रक्ताचा अनुभव कोणी घेतला असेल तर शपथ!
आजचा हा दिवसाचं वेगळा होता, त्या आरोळीने तैल-बैलाला देखील हुरूप चढला असावा. आमच्यातील काही जणांनी पहिली भिंत तर नवख्या ट्रेकर्सनी दुसरी म्हणजे मंदिराची भिंत दुपारपर्यंत सर केली.
आमच्या ५-६ जणांची टीम पहिल्या भिंतीवर चढत होती. वारा वेड्यासारखा वाहत होता. अंगाला झोंबत होता. सुळक्यावर चढताना ३ टप्पे लागतात. आव्हानात्मक असा हा सुळका चढताना अनेकदा पोटात गोळा आला खरा. पण .. तिथेच मला पोहचायचं होतं आणि तिथेच केक कापायचा होता हि जिद्द् वर घेऊन गेली.
त्याचबरोबर ६ वर्षीय ध्रुवी पडवळने हा अवघड असा सुळका चढून सर्वांची शाबासकी मिळवली. त्याची दखल लोकमत आणि पुढारी या वृत्तपत्रांनी घेतली
अखेर मी कडा सर केला .. गिर्यारोहक मित्रांनी सोबत आणलेला चॉकलेट केक बराच बरा राहिला होता. वरच्या बाजूला पोचल्यावर समजलं कि खरंच उंचीवरून दिसणारे हे धरणीमातेचे सौंदर्य किती मोहक आहे. अनेक अनेक महिन्यांनी पुन्हा एकदा निसर्गाला मिठी मारण्याचा भास झाला. डावीकडे घनगड व उजवीकडे सुधागड किल्याना नमन करून भेटायला येईल असं वचन देऊन आले.
अखेर स्वतःला दिलेलं वचन मी माझ्या जन्मदिनी पाळलं. मित्र-परिवारात आणि माझ्या कुटुंबासमवेत सुळक्यावरच वाढदिवस साजरा केला.
स्वतःसाठी जगण्याचा आनंद लाभला.
गडकिल्ले फिरा आणि भावी पिढीला महाराष्ट्र दाखवा

Comments